
अभिनेता विजय देवरकोंडा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील एका मॉलमध्ये त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. त्यानंतर आता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे त्यांच्या आगामी 'लायगर' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुजरातला पोहोचले. वडोदरामध्ये चाहत्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केलं. विजयचा फॅन फॉलोईंग किती मोठा आहे याची प्रचिती या कार्यक्रमातही आली.

गुजरातमधील या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये चाहते विजय आणि अनन्याच्या गळ्यात मोठ्या फुलांचा हार घालताना पहायला मिळत आहेत. या दोन्ही कलाकारांकडून देशभरात लायगरचं जबरदस्त प्रमोशन सुरू आहे.

लायगर या चित्रपटाच्या निमित्ताने साऊथ सुपरस्टार विजय हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. तर अनन्या पांडे ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

विजयच्या चाहत्यांमध्ये फक्त मुलींचाच नाही तर मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या व्हायरल फोटोंमध्ये मुलंसुद्धा विजयसोबत हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तोसुद्धा चाहत्यांना भरभरून प्रतिसाद देत आहे.

25 ऑगस्ट रोजी 'लायगर' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेतल्या चित्रपटांपैकी एक आहे. इंडस्ट्रीतील हा सर्वांत मोठा ॲक्शन चित्रपट असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्ससाठी विजयने खूप मेहनत घेतली आहे.