
सोनी मराठी वाहिनीवर एक नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आज काय बनवू या? - मधुरा स्पेशल' असं या कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमातून मधुरा बाचल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल' या कार्यक्रमाच्या नावातूनच त्याची थीम लक्षात येते. महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या पाककृती आणि प्रेक्षकांचे आवडते पदार्थ करताना मधुरा बाचल या कार्यक्रमात दिसणार आहेत.

‘मधुराज् रेसिपीज’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मधुरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आता या कार्यक्रमाद्वारे मधुरा आणि त्यांच्या पाककृती प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचणार आहेत.

हा कार्यक्रम येत्या 5 मे पासून सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रभरातले वेगवेगळ्या प्रांतांतले विशेष असे खाद्यपदार्थ प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत.

स्वयंपाक येणारे आणि न येणारेसुद्धा 'मधुरा रेसिपीज' या युट्यूब चॅनलवरील रेसिपीज आवर्जून पाहतात. त्यामुळे मधुराच्या या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.