
गणेशोत्सवासाठी अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. गणपतीच्या अनेक कारखान्यात गणेश मुर्ती बनवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काल राज्यातील पहिली गणेश आगमन मिरवणूक मोठ्या थाटात पार पडली.

गणेशोत्सवापूर्वीच कोल्हापुरात बाप्पाच्या आगमनाची धामधूम सुरू झाली आहे. काल राज्याची पहिली गणेश आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. रंकाळा परिसरातील गोल सर्कल येथे आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

मुंबईतील परळ येथील गणेश मूर्ती कारखान्यात ही गणेश मुर्ती घडवण्यात आली आहे. कोल्हापुरात बाप्पा दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

या मिरवणुकीने गणेशोत्सवापूर्वीच शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले 'कोल्हापूरचा राजा'च्या आगमन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बाप्पाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती.

याच गर्दीचा फायदा घेत काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. अनेकांनी होर्डिंग्जवर चढून मिरवणूक पाहण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. या हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लाठीचार्ज केला.

यामुळे गर्दीत तात्पुरता गोंधळ उडाला. पण त्यानंतर पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. एकीकडे आगमन सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, दुसरीकडे काही हुल्लडबाजांमुळे सोहळ्याला गालबोट लागल्याची चर्चा होती.