‘सैय्यारा’ला विसरून ‘या’ चित्रपटाची तुफान क्रेझ; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर वादळ, प्रत्येक शो हाऊसफुल
बॉक्स ऑफिसवर 'सैय्यारा'च्या वादळादरम्यान 25 जुलै रोजी थिएटरमध्ये एक असा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने थेट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. या चित्रपटाचं नाव आहे 'महावतार नरसिम्हा'. हा चित्रपट गेल्या तीन दिवसांपासून हाऊसफुल आहे.
सैय्यारा, महावतार नरसिम्हा
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल |
Updated on: Jul 29, 2025 | 10:38 AM
अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सैय्यारा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 372.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली.
एकीकडे ‘सैय्यारा’ची सर्वत्र क्रेझ असताना 25 जुलै रोजी ‘महावतार नरसिम्हा’ नावाचा अॅनिमेटेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत या चित्रपटाचा प्रत्येक शो हाऊसफुल जात आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक त्यांच्या पूर्ण कुटुंबीयांसोबत थिएटरमध्ये पोहोचत आहेत.
‘महावतार नरसिम्हा’ने पहिल्या दिवशी 1.35 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 6.50 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत 11.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केलंय. तर जयपूर्ण दास यांनी या पटकथालेखनाची जबाबादारी सांभाळली आहे. ‘कांतारा’चे निर्माते होम्बाले फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा राक्षस हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांच्यावर आधारित आहे.
हिरण्यकश्यप स्वत:ला देव घोषित करून भगवान विष्णूचा सूड घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त असतो. राक्षसाचा पराभव करण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान विष्णू हे नरसिम्हाच्या रुपात प्रकट होतात.