Mahesh Manjrekar: पहिली पत्नी आणि सासूमुळेच मी… महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा, मोठ्या मुलीविषयी वक्तव्य
Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी पहिली पत्नी दिपा आणि मुलगी अश्वमी यांच्यासोबतच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली.

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे कायमच चर्चेत असतात. त्यांचा आगामी सिनेमा ‘बंडखोर’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये मांजरेकर यांनी आपल्या खऱ्या आयुष्यातील सक्षम आणि खंबीर महिलांबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.
बालपणीच्या आईच्या पाठिंब्यापासून ते चित्रपटसृष्टीत स्थिरावण्यास मदत करणाऱ्या पहिल्या पत्नी आणि सासूच्या साथीपर्यंत, तसेच मोठ्या मुलीने दिलेल्या धड्यांपर्यंत आयुष्यात आलेल्या प्रत्येक महिलेचा त्यांनी आदराने उल्लेख केला.
आईबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “मी लहानपणापासून माझ्या आईला पाहिले आहे. मी तिचा खूप आदर करतो, कारण ती शिकलेली नव्हती. फार मोठ्या कुटुंबातून आली नव्हती. पण मी तिच्याइतकी खंबीर बाई माझ्या आयुष्यात आजपर्यंत पाहिलेली नाही. त्यामुळे माझ्यावर आईचा खूप प्रभाव आहे. मी अजूनही ती गेली आहे हे स्वीकारलेले नाही.”
मांजरेकर यांनी पहिल्या पत्नी आणि त्यांच्या आईचाही विशेष उल्लेख केला. “माझी पहिली बायको आणि तिची आई यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज या इंडस्ट्रीत आहे. आता जो काही आहे, तो त्यांच्यामुळेच. कारण त्या कायम माझ्याबरोबर सावलीसारख्या होत्या. काहीही झाले तरी त्या माझ्याबरोबर होत्या,” असे ते म्हणाले.
आपल्या मोठ्या मुलीबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले, “माझी मोठी मुलगी अश्वमीने मला आयुष्यात खूप काही शिकवले. त्यातले एक म्हणजे – ‘आम्हाला अक्कल आहे, आम्हाला शिकवायला जाऊ नका.’ मी तिच्यासोबत सिनेमाबद्दल बोलतो आणि ती ज्या पद्धतीने सिनेमा बघते, त्यावरून ती खूप उत्तम दिग्दर्शिक होऊ शकलो. मी तिला म्हटले होते की तुझ्यासाठी चित्रपट करतो. तिने स्पष्टपणे सांगितले ‘तू निर्माता असशील तर मी करणार नाही.’ माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्याच बायका खूप खंबीर आहेत.”
महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा मेहता होते. त्यांचे लग्न १९८७ साली झाले होते. त्यांना अश्वमी मांजरेकर आणि सत्या मांजरेकर ही दोन अपत्ये आहेत. १९९५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दीपा मेहता एक प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर होत्या. त्यांचा ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ हा साड्यांचा ब्रँड विशेष लोकप्रिय होता. २५ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी दीपा मेहता यांचे निधन झाले.