
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस-मधला अध्याय' ही मालिका आता एका अत्यंत थरारक वळणावर पोहोचली असून, आजवर कधीही न घडलेली एक मोठी घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आजवर अजित (देवमाणूस) आपल्या स्वार्थासाठी लोकांचे बळी घेत आला आहे, पण यावेळी लालीने आपल्या पतीसाठी सर्व मर्यादा ओलांडून एक भयंकर कट रचला आहे. रात्रीच्या अंधारात गावात उत्सवाचा माहौल असताना आणि मंदिराभोवती दिव्यांचा प्रकाश पसरलेला असताना, अजित आर्याला लग्नाचे वचन देऊन तिचं मन जिंकतो.

आर्याही विश्वासाने तिच्याकडे असलेल्या 20 लाख रुपयांची माहिती त्याला देते. मात्र, याच नरकी उत्सवात 'मुखवट्यांचा खेळ' सुरू आहे. आणि हीच संधी साधून लाली आर्याला नदीत बुडवून मारण्याचा प्रयत्न करते.

मालिकेत आणखी एक मोठी कलाटणी तेव्हा येणार आहे, जेव्हा हॉस्पिटलमध्ये साकेत जिवंत असल्याचं उघड होणार आहे. तो सध्या कोमामध्ये असला तरी ही बातमी अजितसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

आता जामकर साकेतला पुन्हा गावात घेऊन आल्यामुळे अजितचे सर्व खोटं उघड होणार का आणि लालीने रचलेला हा संपूर्ण कट नेमका कसा होता, याचा थरार येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहता येणार आहे.