
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या कथानकात सतत लक्षवेधी आणि खिळवून ठेवणारी वळणं येत असतात. सध्या मालिकेत इंद्राणीची शक्तीसुद्धा ईशाकडे आहे हे समजल्यावर नेत्रा आणि अद्वैतमधे यावरून संवाद होतं.

नेत्रा तिची चाललेली धडपड अद्वैतकडे व्यक्त करत सगळं सांगते. अद्वैतला त्याची चूक उमगते. तेव्हाच घरात चारही बायकांचं एकमत होतं की घरातल्याना आपण एकत्र ठेवण्यातच खरा आनंद आहे. जिथे केतकी भरभरून बोलते आणि केतकीचा नवरा केदार घरात प्रवेश करतो.

केदारची भूमिका मराठीतला उत्कृष्ट कलाकार अभिजित केळकरने साकारली आहे. या केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात. यामागचं गुपित उलगडलेलं नाही.

केदारच्या येण्याने घरात सगळे आनंदी असताना, इंद्राणीला शंका येते की शेखर काहीतरी लपवत आहे. ती नेत्राशी बोलते, आणि नेत्रा सावध होते. अशावेळी ईशाला दैवी संकेत मिळणार आहे की घरातल्या मैथिलीचा जीव धोक्यात आहे.

केदारवरील संशय आणि संकेतातली व्यक्ती याचा काही ताळमेळ जुळेल का? नेत्रा येणाऱ्या नव्या संकटाशी तोंड देऊ शकेल का? दिवाळीत राज्याध्यक्ष कुटुंबातलं अजून कोणतं रहस्य उघडकीस येणार, या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.