
मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो. या सणाच्या वेळी वातावरणातील गारठा प्रचंड वाढलेला असतो. थंडीच शरीराला उष्णतेची गरज असते. तिळ, शेंगदाणे आणि गुळ उष्णतावर्धक पदार्थ आहेत. म्हणून संक्रांतीला तिळाचे लाडू तयार केले जातात.

तिळाचे लाडू बनवण्यासाठी पांढरे तिळ – ½ वाटी, शेंगदाणे – ½ वाटी, गूळ – ¾ वाटी, तूप – २ टेबलस्पून, वेलची पूड – ½ टीस्पून आवश्यकतेनुसार... हे साहित्य लाडू तयार करण्यासाठी लागतील.

कढईत तिळ मंद आचेवर हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या त्यानंतर बाजूला ठेवा. त्याच कढईत शेंगदाणे भाजून सोलून घ्या. तिळ आणि शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर पूड करा.

कढईत तूप गरम करून त्यात किसलेला गूळ घालून वितळवा. गूळ वितळल्यावर गॅस बंद करून त्यात तिळ–शेंगदाण्याची पूड व वेलची पूड घाला. मिश्रण नीट मिसळून गरम असतानाच हाताने लाडू वळा.

तिळ–शेंगदाण्याची पूड गरम असताच लवकर लाडू तयार करा. कारण गुळ असल्यामुळे मिश्रण लवकर घट्ट होईल. लाडू तयार झाल्यानंतर थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. तयार झालेले लाडू चविष्ट, पौष्टिक आणि हिवाळ्यासाठी खूपच उपयुक्त आहेत.