7 कोटी बजेट, कॉमेडी-ॲक्शन-सस्पेन्सचा तडका; सर्वाधिक कमाई करणारा 9 वा मराठी सिनेमा
मराठी सिनेसृष्टीत सध्या एका नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मैत्रीची एक वेगळीच क्रेझ दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खळखळून हसवत आहे. 2026 या वर्षांतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत नवव्या स्थानी पोहोचला आहे.

मराठी चित्रपटांमध्ये दमदार कथा आणि तितक्याच प्रभावी कलाकारांचा संगम प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतो. असाच एक भन्नाट मल्टीस्टारर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट 31 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स आणि मैत्रीचा रंगतदार प्रवास सांगणाऱ्या या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र पहायला मिळत आहेत.

'मामाच्या गोव्याला जाऊया' हा चित्रपट 2026 या वर्षांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी 5 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर आतापर्यंत भारतात जवळपास दोन कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 23 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी 41 लाख रुपये, चौथ्या दिवशी 11 लाख रुपये, पाचव्या दिवशी 13 लाख रुपये, सहाव्या दिवशी 9 लाख रुपये, सातव्या दिवशी 9 लाख रुपये, आठव्या दिवशी 8 लाख रुपये, नवव्या दिवशी 19 लाख रुपये आणि दहाव्या दिवशी 26 लाख रुपये कमावले आहेत.

'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा बजेट 7 कोटी रुपये इतका आहे. कमाईतून हा आकडा अद्याप रिकव्हर झाला नसला तरी या चित्रपटाने 'तिघी'ला मागे टाकलं आहे. 'तिघी' या चित्रपटाने 1.64 कोटी रुपयांची कमाई केली होती. गोव्याच्या ट्रिपला निघालेल्या संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांच्या लाडक्या मामाची धमाल या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळतेय.

या चित्रपटात कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांची अफलातून केमिस्ट्री पहायला मिळत आहे. त्यांच्यातील संवाद, टायमिंग आणि धमाल प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्याचबरोबर महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्याही दमदार भूमिका आहेत. याशिवाय नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांनीही काम केलंय.