
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आणि आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदान, महापालिकेचे मुख्यालय आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा बांधवांची मोठी गर्दी दिसून आली.

या आंदोलकांमुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अनेक आंदोलकांनी रस्त्यावर गाड्या पार्किंग केल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

या आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर गर्दी केल्यानंतर आता ते मरिन ड्राईव्ह भागात समुद्रकिनारी उतरले आहेत. हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला होता. पण सरकारने ही मागणी पूर्ण न केल्याने जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला मराठा समाजातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईबाहेरून आलेल्या आंदोलकांना मुंबईतील वाशी, वाडी बंदर, शिवडी, माझगाव डॉक यांसारख्या विविध ठिकाणी थांबवण्यात आले आहे.

हे आंदोलक दररोज सकाळी मुंबई लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर येतात आणि तिथून आझाद मैदानाकडे जातात. प्रवासादरम्यानही हे आंदोलक 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत आहेत.

ज्यामुळे मुंबई लोकलमध्येही मराठा आरक्षणाचा आवाज ऐकू येत आहे. या आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "उच्च शिक्षण घेऊनही आणि पदवीधर असूनही आम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही, त्यामुळे शेती करावी लागत आहे. याच कारणामुळे आम्ही मुंबईत आंदोलन करत आहोत.