
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे गायत्री दातार. अतिशय शांत, सोज्वळ भूमिकांमुळे गायत्रीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता गायत्री कोणत्या भूमिकेमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

गायत्री दातारने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला होता. मात्र, या फोटोमध्ये तिने नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. आता गायत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती होणाऱ्या नवऱ्यासोबत दिसत आहे.

गायत्रीने शेअर केलेला व्हिडीओ हा समुद्रकिनारी शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर तिचा होणार नवरा श्रिकांत चवरेने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. दोघांनी रोमँटिक अंदाजात हा व्हिडीओ शूट केला आहे.

सध्या सोशल मीडियावर गायत्रीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. अनेकांनी गायत्रीच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. धनश्री काडगांवकर, रेश्मा शिंदे, प्रीतम कागणे आणि इतर काही कलाकारांनी कमेंट्स करत गायत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी गायत्रीला ट्रोल करण्य़ास सुरुवात केली आहे.

एका यूजरने कमेंट करत गायत्रीला 'ह्यापेक्षा सरंजामे चांगला होता' असे म्हटले आहे. गायत्री दातारने तुला पाहते रे या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावेने विक्रांत सरंजामेची भूमिका केली होती. ईशा (गायत्री दातार) आणि विक्रांत यांच्यातील प्रेमकहाणीने त्यावेळी सर्वांचे लक्ष वेधले होते. कारण दोघांमधील वयामध्ये देखील अंतर होते.

गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव श्रीकांत चौरे आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतले आहे. श्रीकांतला फोटोग्राफीची देखील आवड आहे. त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक ड्रोन फोटोग्राफीचे फोटो आकर्षक फोटो शेअर केले आहेत. तसेच तो अनेक देशांमध्ये देखील फिरला असल्याचे फोटोंवरुन दिसत आहे.