
स्त्री आणि पुरुष जेव्हा रिलेशनशिप मध्ये असतात तेव्हा स्त्रियांच्या गरजांविषयी उघडपणे बोललं जातं पण पुरुषांच्या गरजांविषयी तितकंसं बोललं जात नाही. शारीरिक गरजा नेहमीच चर्चिल्या जातात पण नात्यात भावनिक गरजा सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. काय असतात पुरुषांच्या भावनिक गरजा? जाणून घेऊयात...

आदर: पुरुषांसाठी "आदराची भावना" खूप महत्त्वाची आहे. कुठल्याही नात्यात आदर खूप महत्त्वाचा आहे. पुरुषांना आपल्या लाईफ पार्टनर कडून कौतुक हवं असतं. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर केला जावा, त्यांच्या विचारांचा आदर केला जावा अशी एक साधारण अपेक्षा ते आपल्या लाईफ पार्टनर कडून ठेवतात.

स्वीकार: पुरुषांना जसं आहे तसं स्वीकारलं तर त्यांच्या इतकं त्या नात्यात सुखी कुणीही नसतं. आपण आहोत असं आपल्याला स्वीकारलं जावं अशी अपेक्षा प्रत्येक पुरुषाची असते. दुसऱ्या पुरुषासोबत आपली तुलना होऊ नये, आहे असं आपल्याला मान्य केलं जावं ही पुरुषांची भावनिक गरज, भावनिक अपेक्षा असते.

सुरक्षितता: नात्यात सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. आपण जर एखादी चूक केली तर आपला लाईफ पार्टनर आपल्याला सोडून जाणार नाही अशा प्रकारची सुरक्षितता पुरुषांना महत्त्वाची वाटते. "हे नातं खूप सुरक्षित आहे", "मी कितीही चुकलो तरी मला समोरची व्यक्ती सोडणार नाही" ही सुरक्षितता पुरुषांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

प्राधान्य: मला समोरच्याच्या आयुष्यात प्राधान्य आहे. मी जोडीदाराच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे असं पुरुषांना वाटायला हवं. जोडीदाराच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बघता मी त्या यादीत कुठे येतो याचा विचार पुरुष करतात. ही भावनिक अपेक्षा पुरुषांची आपल्या जोडीदाराकडून असते.