
अनेकदा उत्सव, पार्टी किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये दारूला कोल्ड ड्रिंक, सोडा किंवा फ्रूट ज्यूस मिसळून प्यायले जाते. हे मिश्रण चवीला सुंदर लागते, आकर्षक वाटते आणि नशा लवकर चढतके असं वाटतं, असे अनेकांना वाटते. पण हे आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरतं. अशा प्रकारे दारू पिण्याने शरीरावर अनेक गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होतात. आता हे परिणाम कोणते चला जाणून घेऊया...

कोल्ड ड्रिंक आणि अल्कोहोल दोन्ही मूत्रवर्धक असल्याने शरीरातील पाण्याची मात्रा झपाट्याने कमी होते. यामुळे डिहायड्रेशन होऊन थकवा, डोकेदुखी आणि इतर त्रास उद्भवतात. याशिवाय, कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूसमध्ये असलेली भरपूर साखर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवते. हे विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरते.

या मिश्रणामुळे नशा लवकर चढते, ज्यामुळे व्यक्तीला स्वतःची मर्यादा समजत नाही आणि सामान्यपेक्षा जास्त दारू प्यायली जाते. परिणामी, हृदय गती आणि रक्तदाब वाढतो. विशेषतः एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेल्या कॅफिनमुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. अनेकदा अशा मिश्रणामुळे व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊ शकते.

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, दारूला फक्त पाणी मिसळून पिणे तुलनेने कमी हानिकारक असते. कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूस मिसळल्याने नशा लवकर येतो, पण यकृत, हृदय आणि पचनसंस्थेवर दीर्घकाळात वाईट परिणाम होतात. हे मिश्रण क्षणिक मजा देत असले तरी आरोग्यावर होणारे नुकसान खूप गंभीर असू शकते.

आरोग्य जपण्यासाठी दारू पूर्णपणे टाळणे हेच उत्तम आहे. जर प्यायचेच असेल तर पाणी किंवा कमी साखर असलेले मिश्रण वापरावे आणि शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. सावध राहूनच आरोग्य सुरक्षित ठेवता येईल. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)