Eknath Shinde: शेतकर्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, कोरडा दुष्काळ जाहीर होताच एकनाथ शिंदे यांचे मोठे आश्वासन
Eknath Shinde on Dry Drought: राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असे मोठे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना शिवसैनिक सुद्धा जातीने मदतीसाठी हजर राहतील असे ठाम वचन दिले.

Eknath Shinde on Dry Drought: सरकारने राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. जवळपास 75 टक्के महाराष्ट्र हा दुष्काळाच्या टाचेखाली आला आहे. ही भीषण परिस्थिती ओढावल्याने शेतकरीच नाही तर सामान्य नागरिकही धास्तावला आहे. कोरडा दुष्काळ जाहीर होताच तात्काळ युद्ध पातळीवर सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. पंचनामे सुरू झाले आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठी संवाद साधल्यावर माहिती दिली. तर राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्दही शिंदे यांनी दिला. शिवसैनिक सुद्धा जातीने मदतीसाठी हजर राहतील असे ठाम वचन दिले.
दिलेला शब्द पाळणारे आमचे सरकार
राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यात सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला, याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले. दुष्काळी पाहणी करून आल्यानंतर कालच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्याप्रमाणे 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर केलेला आहे. दिलेला शब्द पाळणारे आमचे सरकार आहे. जे बोलतो ते आम्ही करतो. शेतात काही उरलेले नाही. उभ पिक करपलं आहे, असे शेतकरी व्यथा मांडत होते. तेव्हा आम्ही त्यांना खचून जाऊ नका, धीर सोडू नका. सरकार तुम्हाला आधार देणार. तुमच्या पाठीशी राहणार असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आम्ही कोरडा दुष्काळ जाहीर केला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
12 प्रकारच्या सवलती
कोरड्या दुष्काळतंर्गत ज्या काही योजना आहेत. सवलती आहेत. कर्जाचं पुनर्गठण आहे. कर्ज माफी आहे. शेतसारा आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. जनावारांना चारा असेल, अशा 12 प्रकारच्या सवलती या शेतकर्यांना मिळतील. शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. एक शेतकरी रडत आला, आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही असा म्हणाला. मुलाचं शिक्षण कसं करणार, फी कशी भरणार, खाणार काय? असे तो म्हणाला. मी त्याला एकच सांगितलं की सरकारने तुमची जबाबदारी घेतली आहे. आम्ही बोलणारे नाही तर करणारे आहोत. तुम्ही काळजी करू नका. दोन ते तीन दिवसात तुम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळेल, असं सांगितल्याचे शिंदे यांनी माहिती दिली.
तात्काळ, युद्धपातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामसेवक असतील, तलाठी हे पंचनामे करतील. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीही सरकारने अशीच पावले टाकली होती. यावेळी सुद्धा सांगतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट देण्यात येणार आहे. पीक कर्जाचं पुनर्गठण करण्यात येणार आहे. शेतीसाठी कर्ज घेतले असेल तर त्याला स्थगिती आहे. कृषीपंपासाठीच्या वीज बिलात सूट देण्यात येणार आहे. वीज खंडीत होणार नाही. विद्यार्थ्यांची शुल्क आणि परीक्षा शुल्क माफी मिळेल. रोजगार हमी योजनेतून कामं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि जनावरांच्या पाणी-चाऱ्याची सोय करून देण्यात येणार आहे. अन्नधान्याची व्यवस्था करून देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
