
आमदार निलेश लंके हे नाव एका तालुक्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. निलेश लंके यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या कामाचं राज्यभर कौतुक होतं. कोरोनाकाळातलं त्यांचं काम तर अनेकांची मनं जिकून गेलं. कोरोनाकाळात ते खुद्द कोविड सेंटरमध्ये ठाण मांडून बसले होते.

कोविड काळात पारनेरचे आमदार म्हणून त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या याच कामामुळे राज्यभरात अनेकजण त्यांचे चाहते बनले आहेत. निलेश लंके जिथे जातात तीथे सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची चढाओढ सुरू असते. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील व्यवसायाने टेलर असलेल्या एका चाहत्याने अवघ्या वीस मिनिटांत शर्ट शिवून तो लंके यांना भेट दिला.

या सर्वसामान्य चाहत्याचे हे प्रेम बघून निलेश लंके देखील भारावून गेले. आमदार निलेश लंके हे राहाता येथे आले असता त्यांनी विविध दुकानांना भेटी दिल्या. याच वेळी त्यांनी चितळी रस्त्यावरील अमोल चौधरी यांच्या समर्थ टेलर या दुकानाला देखील भेट दिली.

त्यानंतर लंके हे किशोर तरटे नावाच्या मित्राकडे जेवणासाठी गेले. त्याच दरम्यान अमोल चौधरी आणि मित्र सिराज शेख यांना एक कल्पना सुचली आणि लंके यांना भेट देण्यासाठी चौधरी यांनी आपला सहकारी विशाल पवार याला सोबत घेत अवघ्या वीस मिनिटात नवीन शर्ट शिवून तयार केला.

अमोल चौधरी यांनी अवघ्या वीस मिनिटांत शर्ट शिवून भेट दिल्याने आमदार निलेश लंके हे देखील अवाक झाले. माझ्या आयुष्यातील ही घटना मी कधी विसरू शकत नसल्याचे म्हणत या चाहत्याचे त्यांनी कौतुक केले. एकाद्या नेत्याला असे प्रेम क्वचितच नशिबात असते.