
आपण कुठेतरी मस्त बाईक राईड करायला निघालोय आणि अचानक रस्त्यात पेट्रोल संपलं तर सर्वच गोष्टीचा हिरमोड होतो. रस्त्यात बाईकचे पेट्रोल संपणं ही खूप त्रासदायक गोष्ट आहे. पण जर कधी अशी परिस्थिती आलीच तर काय करावे हे अनेकांना समजत नाही. काही जण गोंधळतात, घाबरतात.

अनेकदा प्रवास करताना अचानक बाईकमधलं पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यात अडकून पडायची वेळ येते. अशावेळी बाईक ढकलण्याशिवाय पर्याय नसतो आणि यामुळे खूप त्रास होतो. पण अशावेळी मग तुम्ही काही सोप्या युक्त्या केल्यात तर तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपापर्यंत पोहोचू शकता.

विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला अजिबात मेहनत घ्यावी लागत नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही पेट्रोल पंपापर्यंत पोहोचू शकता. तसेच यामुळे तुम्हाला तुमची गैरसोयही टाळता येते.

जर तुमची बाईक सुरू होत नसेल आणि पेट्रोल संपलेलं असलं तुम्ही बाईकच्या चॉकचा वापर करु शकता. काही बाईकमध्ये चॉक चालू केल्यावर टाकीच्या तळाशी जमा झालेले थोडेसे पेट्रोल इंजिनपर्यंत पोहोचते. यामुळे बाईक थोड्या वेळासाठी सुरु होते.

जर तुम्ही चॉकचे बटण दाबल्यानंतर बाईक सुरु केली, तर अजिबात वेळ न घालवता जवळच्या पेट्रोल पंपाजवळ पोहोचा. पण हे लक्षात ठेवा की सर्वच बाईकमध्ये चॉकची सिस्टीम नसते. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी काळजी घ्या. जर चॉक काम करत नसेल, तर तुम्ही इंधन टाकीमध्ये हवा भरून दाब निर्माण करण्याचा प्रयत्न करु शकता. यासाठी, बाईकच्या पेट्रोल टाकीचं झाकण थोडं उघडा. त्यात हळू हळू फुंकर मारा.

पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यात धूळ जाणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे टाकीमध्ये थोडा दाब निर्माण होतो. यानंतर उरलेले पेट्रोल इंजिनपर्यंत पोहोचू शकते. कधीकधी ही सोपी युक्ती काम करते आणि बाईक सुरू होते.

जेव्हा पेट्रोल खूपच कमी शिल्लक राहतं, तेव्हा ते टाकीच्या एका बाजूला जमा होतं. त्यामुळे ते इंजिनपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत, बाईक साइड स्टँडवर उभी करा. थोडा वेळ तशीच ती झुकवून ठेवा. यामुळे, टाकीमध्ये जमा झालेलं पेट्रोल इंजिनपर्यंत पोहोचते आणि बाईक सुरु होते.

हे उपाय तुम्हाला संकटातून वाचवू शकतात, पण प्रत्येक वेळीच त्या काम करतील असं नाही. त्यामुळे, प्रवासाला निघण्यापूर्वी नेहमी पेट्रोल किती आहे, याकडे लक्ष ठेवा. तसेच इंधन टाकी पूर्ण भरलेली असल्याची खात्री करा. त्यासोबतच मोबाईलमध्ये जवळच्या पेट्रोल पंपांचं लोकेशन सेव्ह करून ठेवा, जेणेकरून गरज पडल्यास तुम्हाला ते पटकन शोधता येईल.