
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाबत सर्वसामान्यांना नेहमीच मोठे कुतूहल असते. मात्र, या अलिशान इमारतीत अंबानी कुटुंबाचे जेवण कसे असते, याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

मुकेश अंबानींचे राहणीमान अत्यंत साधे आहे. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आणि जगभरातील सोयीसुविधा हाताशी आहेत. तरीही त्यांच्या घरात बाहेरून जेवण मागवण्यावर कडक निर्बंध आहेत. विविध राज्यांतील शेफद्वारे इथे पारंपारिक पद्धतीने पदार्थ तयार केले जातात.

अँटिलियामध्ये काम करणारे शेफ भारताच्या विविध राज्यांतील आहेत, जे त्या-त्या भागातील पदार्थ अस्सल पारंपारिक पद्धतीने बनवण्यात माहीर आहेत. ते कुटुंबातील सदस्यांना जे काही खाण्याची इच्छा होते, ते सर्व पदार्थ घरातील किचनमध्येच ताज्या स्वरूपात बनवून देतात.

मुकेश आणि नीता अंबानी हे दोघेही शुद्ध शाकाहारी आहेत. घरामध्ये होणाऱ्या मोठ्या पार्टी असोत किंवा एखादा कौटुंबिक सोहळा इथे सर्वत्र फक्त शाकाहारी भोजनच दिले जाते.

तसेच अंबानी कुटुंबाच्या जेवणात हंगामी भाज्या आणि संतुलित आहाराला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. धार्मिक उत्सवाच्या वेळी जैन परंपरेनुसार कांदा आणि लसणाचा वापर टाळला जातो.

अंबानींच्या किचनमध्ये जगातील कोणतेही पदार्थ उपलब्ध असूनही कुटुंबाला डाळ, भाजी, पोळी आणि भात अशी साधी भारतीय थाळीच जास्त प्रिय आहे. अंबानींच्या अँटिलियाचा रोजचा डाएट प्लॅन समोर आला आहे.

अंबानींच्या दिवसाची सुरुवात इडली, पोहे, उपमा किंवा डोसा अशा दक्षिण भारतीय आणि महाराष्ट्रीयन पदार्थांनी होते. त्यासोबत ताजी फळे आणि ज्यूसचा समावेश असतो. तसेच दुपारच्या जेवणात प्रामुख्याने विविध प्रकारच्या डाळी, भाज्या, पोळी आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ असतात.

त्यासोबतच संध्याकाळच्या वेळी चाट, ढोकळा किंवा फळे खाण्याला पसंती दिली जाते. तसेच रात्रीचे जेवण हलके ठेवण्यावर भर दिला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने सूप, पालेभाज्या आणि पोळीचा समावेश असतो.