
महाराष्ट्रात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना दुसरीकडे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील कसाराजवळ एका कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा येथील ऑरेंज हॉटेलजवळ हा अपघात घडला. मुंबईहून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे, ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या ड्रेनेजमध्ये जाऊन आदळली.

या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात गाडीमधील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृतांची ओळख अजून पटलेली नाही. ते सर्व उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याची शक्यता आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, कसारा पोलीस आणि रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली.

त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. अपघातानंतर तिन्ही मृतदेह रुग्णवाहिकेने उत्तरीय तपासणीसाठी खर्डी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कसारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी चालकांनी सुरक्षिततेची आणि वेगमर्यादेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.