कमी बजेट- हाय सस्पेन्स, डोक्याला मुंग्या आणणारा क्लायमॅक्स; ओटीटीवर नंबर 1 ठरला चित्रपट
अत्यंत उत्कंठावर्धक कथा असलेल्या या चित्रपटात दर 15-20 मिनिटांनी नवीन ट्विस्ट येतो. यातील सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. ओटीटीवर येताच हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

2 तास 16 मिनिटांचा हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पोलीस इन्वेस्टिगेशन थ्रिलर जॉनरचा हा चित्रपट 'धुरंधर : द रिव्हेंज'नंतर जियो हॉटस्टारवर आलेला खऱ्या अर्थाने दमदार सिनेमा आहे. जर तुम्हाला सायकोलॉजिकल ड्रामा आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांच्या कथा आवडत असतील, तर हा चित्रपट पूर्ण संपवल्याशिवाय तुम्ही जागेवरून उठू शकणार नाही.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हा चित्रपट 4 ऑगस्टपासून जियो हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे. हा तुम्हाला हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये पाहता येईल. एम. पद्मकुमार दिग्दर्शित या मल्याळम क्राइम थ्रिलरमध्ये कन्नूरमधील धर्मदम पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या अजीब रहमान (रोशन मॅथ्यू) या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाची कथा दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटाची सुरुवातच फ्लॅशबॅकने होते. एका विहिरीत एका महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्यावर या चित्रपटाची कथा सुरू होते. महाराष्ट्रात ट्रेनने प्रवास करत असताना एका लहान मुलाची धाकटी बहीण अचानक गायब होते. काही काळानंतर अजीब रहमान यांना विहिरीत त्या महिलेचा मृतदेह सापडतो. सुरुवातीला ही आत्महत्या वाटते, पण जसजसा तपास पुढे सरकतो, तसतसा मोठ्या कटाचा उलगडा होतो.

पीडित महिला ही शोभा (श्रुती मेनन) नावाची एक मजूर असल्याचं निष्पन्न होतं. सुरुवातीला सोपं वाटणारं प्रकरण, हळूहळू एका मोठ्या गुन्हेगारी नेटवर्क आणि मानवी तस्करीचा पर्दाफाश करू लागतं. पुढे अजीबचा स्वत:चा भूतकाळ समोर येतो, तेव्हा कथेला एक वेगळंच वळण लागतं. अवघ्या तीन ते सात कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे.

या चित्रपटाचं नाव आहे 'उयीर'. आयएमडीबीवर या चित्रपटाला दहापैकी 8.2 रेटिंग मिळाली आहे. यामध्ये रोशन मॅथ्यू मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत बैजू संतोष, शाजू श्रीधर, अतुल्य चंद्रा, दिव्या एम. नायर, सैयामी खेर, श्रुती मेनन, विनीत थट्टिल, विनोद सागर यांच्याही भूमिका आहेत.