
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्य याच्या महागड्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. नाग चैतन्यच्या कार कलेक्शनमध्ये फरारीपासून बीएमडब्ल्यूपर्यंत अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यात आता पोर्शे 911 GT3 RS ची भर पडली आहे.

या कारची भारतात एक्स शोरुम किंमत 3.51 कोटी रुपये इतकी आहे. या कारचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 17 मे रोजी या कारची नोंदणी करण्यात आली. ही हैदराबादमधील पहिली पोर्शे 911GT3RS असल्याचं म्हटलं जातंय.

ही नवी कोरी कार चालवतानाचा नाग चैतन्यचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाग चैतन्यकडे इतरही काही महागड्या गाड्या आहेत. यात फरारी आणि रेंज रोव्हर डिफेंडर 110 चाही समावेश आहे.

नाग चैतन्यकडे फरारी 488GTB (3.88 कोटी रुपये), बीएमडब्ल्यू 740 Li (1.30 कोटी रुपये), 2X लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग (1.18 कोटी रुपये), निस्सान GT-R (2.12 कोटी रुपये), मर्सिडीज बेंझ जी-क्लास G 63 AMG (2.28 कोटी रुपये), एमव्ही ऑगस्टा F4 (35 लाख रुपये) आणि BMW 9RT (18.5 लाख रुपये) या गाड्या आहेत.

नाग चैतन्यने 2022 मध्ये 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याने आमिर खान आणि करीना कपूर यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या.