Nana Patekar Net Worth: नाना पाटेकर कोट्यवधींचे मालक, तरीही जगले साधं आयुष्य; संपत्तीचा आकडा थक्क करणारा
Nana Patekar Net Worth: प्रसिद्धी आणि संपत्ती असूनही नाना पाटेकर यांनी साधेपणाला दिलेलं महत्त्व आणि सामाजिक कार्यातील योगदान यामुळे त्यांची वेगळी ओळख कायम राहिली.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि संपत्तीचीही चर्चा सुरू झाली आहे. जवळपास पाच दशकं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नाना पाटेकर यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, इतकी लोकप्रियता आणि कोट्यवधींची संपत्ती असूनही त्यांची जीवनशैली बॉलिवूडमधील अनेक कलाकारांपेक्षा साधी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांची एकूण संपत्ती जवळपास 50 ते 80 कोटी रुपये आहे. त्यांच्या नावावर मुंबईतील फ्लॅट, गोव्यातील घर आणि पुण्याजवळ मोठा फार्महाऊस आहे. नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अनेक वर्षं काम करून ही संपत्ती कमावली आहे. एका चित्रपटासाठी ते साधारण 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेत असल्याचंही सांगितलं जातं.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार आलिशान बंगले आणि मोठ्या घरांसाठी ओळखले जातात. मात्र, नाना पाटेकर यांची राहणी तुलनेनं साधी होती. ते मुंबईतील अंधेरी परिसरात सुमारे 750 चौरस फुटांच्या एका बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या घराची अनेक दशकांपूर्वीची खरेदी किंमत अंदाजे 1.1 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं. सध्याच्या बाजारमूल्याचा अंदाज जवळपास 3 कोटी रुपये व्यक्त केला जातो. नाना पाटेकर यांनी आपल्या आईसोबत या घरात बराच काळ वास्तव्य केलं होतं.
मुंबईसोबतच गोव्यातही नाना पाटेकर यांचं घर होतं. ते मुंबई, गोवा आणि पुणे या ठिकाणी वेळ घालवत असत. गोव्यातील त्यांचं घर मुंबईतील साध्या फ्लॅटपेक्षा अधिक आधुनिक आणि प्रशस्त असल्याचं सांगितलं जातं. गोव्यातील डोना पावला परिसरातील निवासस्थानीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नाना पाटेकर यांच्या मालमत्तांमध्ये पुण्याजवळील खडकवासला परिसरातील फार्महाऊसचाही समावेश आहे. हा फार्महाऊस सुमारे 27 एकरांवर पसरलेला आहे. या जागेवर सात खोल्या आणि मोठा हॉल असल्याची माहितीही समोर आली आहे. या जमिनीवर गहू आणि भात यांसारखी पिकं घेतली जातात. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग शेतमजूर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केला जातो.