
अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या एका मुलाखतीच्या क्लिपमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. या मुलाखतीत तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि तेव्हापासून ही निळ्या रंगाच्या साडीतील अभिनेत्री कोण, अशी चर्चा इंटरनेटवर सुरू झाली. रातोरात गिरीजाला 'नॅशनल क्रश'चा टॅग देण्यात आला.

गिरीजा मराठी कलाविश्वातील जरी लोकप्रिय अभिनेत्री असली तरी देशभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांना तिच्याविषयी माहीत नव्हतं. परंतु त्या एका क्लिपमुळे तिच्याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली. असंख्य लोक तिला डीएम (डायरेक्ट मेसेज) करू लागले होते.

नॅशनल क्रश बनलेल्या गिरीजाने आता एक नवीन फोटोशूटमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. गिरीजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. समुद्रकिनारी तिने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.

साडी आणि पॅन कॉलर ब्लाऊज असा गिरीजाचा साधाच लूक आहे. तरीही त्यात तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने गिरीजाचं हे खास फोटोशूट केलंय.

गिरीजाच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'मराठी रंगभूमीची राणी' असं एकाने म्हटलंय, तर 'बहुतेक माझा घटस्फोट होणार सारखे सारखे फोटो बघून' अशी मजेशीर कमेंट दुसऱ्या युजरने केली. 'आह... सुंदर' अशी कमेंट अभिनेत्री प्रिया बापटने केली आहे.