
निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप नुकतीच लग्नबंधनात अडकली. आलिया आणि शेन ग्रेगॉइर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी त्याची मुलगी शोरासोबत पोहोचला होता.

मुलगी शोरासोबत नवाजुद्दीन पापाराझींसमोर येताच सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. पापाराझी अकाऊंटवरून बापलेकीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

शोराचं सौंदर्य पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्यावरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'सुहाना खान, जान्हवी कपूर, खुशी कपूर, अनन्या पांडे.. या सर्व स्टारकिड्सना तिने मात दिली आहे', असं एकाने लिहिलं. तर 'ती सोनाक्षीसारखी दिसते, पण तिच्या ऐश्वर्यासारखी अदा आहे', असं दुसऱ्याने म्हटलंय.

'हिचं इंडस्ट्रीत येणं पक्कं आहे. अभिनेत्रीसारखा तिचा चेहरा आहे', असंही अनेकांनी म्हटलंय. याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये नवाजुद्दीनने तिच्या मुलीच्या करिअरविषयी सांगितलं होतं. तिलासुद्धा अभिनयक्षेत्रात काम करायचंय असं तो म्हणाला होता.

"शोरा माझ्या कामाबद्दल तिची मतं मोकळपणे मांडते, कधीकधी टीकाही करते. बाबा, डान्स करण्याचा विचारसुद्धा करू नका, असं ती मला म्हणते", असं नवाजुद्दीनने एका मुलाखतीत सांगितलं होतं.