जिल्हात धरण शेजारी… तरी गावकऱ्यांच्या घशाला कोरड… पाण्यासाठी जीवघेणी धडपड
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या कवठा गावात पाण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय... एका बाजूला गावाशेजारी धरणात पाणी साठलेलं आहे... तर दुसऱ्या बाजूला गावकरी मात्र पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डे खोदून दूषित पाणी पिण्यास मजबूर झाले आहेत.

‘धरण उशाला आणि कोरडा घशाला’ अशी संतापजनक परिस्थिती कवठा गावात पाहायला मिळतेय. उन्हाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलाय. अशात गावातील महिला, पुरुष आणि लहान मुलांना दररोज तब्बल दीड किलोमीटरची पायपीट करत मन नदीच्या पात्रात जावं लागतं...

तिथं वाळूत खड्डे खोदून झिरपणारं पाणी जमा केलं जातं आणि त्याच पाण्यावर गावकऱ्यांची तहान भागते... मात्र हे पाणी दूषित असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून यामुळे येथील गावात मुली देत नसल्याने या गावातील मुलांचे लग्न होत नाही....

विशेष म्हणजे कवठा येथे विदर्भ पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बॅरेजचं काम 2015 पासून सुरू करण्यात आलं होतं... 2017 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटनही करण्यात आलं...

2018 मध्ये धरणात पाणी अडवण्यात आलं आणि आजही धरणात पाणीसाठा आहे... मात्र गावकऱ्यांच्या नळापर्यंत हे पाणी अद्याप पोहोचलेलं नाही. तर गेल्या 25 वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कवठा ग्रामस्थांचा सवाल आता एकच आहे...

धरण गावात आहे, पाणी धरणात आहे... मग आमच्या घरात पाणी कधी येणार...? कवठा गावकऱ्यांची ही पाण्यासाठीची रोजची लढाई प्रशासनाच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे,गणेश सोनोने,अकोला....!