
आजकाल अनेक लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक आहेत. पण तोंडाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. आपण दररोज टूथब्रश वापरतो, पण तो कधी बदलायचा आणि कसा वापरायचा याबद्दल अनेक लोकांना माहिती नसते. आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

जुना आणि खराब झालेला टूथब्रश वापरल्याने तोंडाचे आरोग्य बिघडू शकते. तसेच बॅक्टेरियांचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे डेन्टिस्टच्या मते प्रत्येकाने दर २ ते ३ महिन्यांनी आपला टूथब्रश बदलावा. अनेक महिने एकच ब्रश वापरल्यास त्याचे ब्रिसल्स झिजतात.

यात मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया जमा होतात. जेव्हा तुम्ही अशा ब्रशने दात घासता, तेव्हा हे बॅक्टेरिया पुन्हा तुमच्या तोंडात जातात. ज्यामुळे दात आणि हिरड्यांचे नुकसान होऊ शकते. ब्रशचे ब्रिसल्स खराब झाले, वाकडी झाली किंवा तुटली तर २-३ महिन्यांपूर्वीही तो ताबडतोब बदलावा.

खराब झालेले ब्रिसल्स दातांची योग्य साफसफाई करू शकत नाहीत. यामुळे हिरड्यांना इजा होण्याची शक्यता असते. ज्या लोकांच्या हिरड्या संवेदनशील आहेत किंवा ज्यांना हिरड्यांचे काही आजार आहेत, त्यांनी नेहमी मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा. यामुळे हिरड्यांना कमीत कमी त्रास होतो.

ज्यांचे तोंडाचे आरोग्य चांगले आहे, ते मध्यम ब्रिसल्सचा टूथब्रश वापरू शकतात. जर तुमच्या टूथब्रशचे ब्रिसल्स लवकर झिजत असतील, तर याचा अर्थ तुम्ही दात खूप जोरात घासत आहात. दात जास्त जोर लावून घासल्याने हिरड्या आणि दातांच्या आवरणाला नुकसान होऊ शकते.

योग्य पद्धतीने ब्रश करताना हलक्या हाताने आणि गोलाकार गतीमध्ये दात घासावेत, असे दंतवैद्य सांगतात. ब्रश दातांच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल याची खात्री करा. योग्य ब्रशिंगमुळे दातांवरील प्लाक निघून जातो आणि दात दीर्घकाळ निरोगी राहतात.

दंत आरोग्य हे केवळ तोंडापुरते मर्यादित नसून ते तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेले आहे. यामुळे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे आवश्यक आहे.

रात्री ब्रश केल्याने जेवणानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नकण साफ होतात, ज्यामुळे बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते. दर २ ते ३ महिन्यांनी ब्रश नक्की बदला. कोणत्याही प्रकारची दंत समस्या जाणवल्यास ताबडतोब दंतवैद्याचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार करा.