
रावळपिंडी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या पहिल्या डावाचा शेवट झाला आहे. पाकिस्तानचा पहिला डाव संपवण्यात दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या हनुमानाच्या भक्ताने महत्वाची भूमिका बजावली.

आम्ही बोलतोय भारतीय वंशाच्या केशव महाराजबद्दल. तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळतो. केशव महाराज हनुमानाचा मोठा भक्त आहे. हिंदू धर्मावर त्याची श्रद्धा आहे. सध्या त्याने रावळपिंडी टेस्टमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला नामोहराम करुन सोडलय.

दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराज ग्रोइन इंजरीचा सामना करत होता. त्या दुखापतीमुळे त्याला लाहोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळता आला नाही. यात दक्षिण आफ्रिकेला 93 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

रावळपिंडीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने दमदार पुनरागमन केलं आणि कमालीची गोलंदाजी केली. केशव महाराजने पाकिस्तान विरुद्ध रावळपिंडी टेस्टमध्ये पहिल्या डावात 42.4 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 102 धावा देऊन 7 विकेट काढले.

नऊ वर्षात टेस्ट करिअरमध्ये एका इनिंगमध्ये पाचपेक्षा जास्त विकेट घेण्याची त्याची ही 12 वी वेळ आहे. याआधी दोनवेळा एका इनिंगमध्ये 7-7 विकेट घेण्याचा कारनामा केशव महाराजने बांग्लादेश विरुद्ध वर्ष 2022 मध्ये केला होता.