
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीची झीज झाली आहे. ही झीज भरून काढण्यासाठी आता मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करावी लागणार असल्याचे पत्र भारतीय पुरातत्व विभागाने विठ्ठल मंदिर समितीला दिले आहे.

त्यानुसार विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे. यामुळे मूर्तीची होणारे झीज थांबविता येणार आहे. चैत्र यात्रा संपल्यावर इपॉक्सी लेप लावण्याबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे.

लवकरच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, मंदिर समिती आणि प्रतिष्ठित महाराज मंडळींची चर्चा करून विठ्ठलाच्या ज्या ज्या भागांची झीज झाली आहे, त्या त्या भागाला एपॉक्सी लेप लावण्यात येणार आहे.

विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी विठ्ठल मंदिर किती दिवस बंद ठेवायचे, याबाबतचा निर्णय पुरातत्त्व विभागाशी चर्चा करुन घेतला जाणार आहे.

विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे कामांपैकी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा 5 जूनपर्यंत पूर्ण करणार आहे.

आषाढी यात्रेत प्रायोगिक तत्त्वावर श्री विठ्ठलाचे टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबद्दलची माहिती दिली.

श्री विठ्ठल मूर्तीला झीज झालेल्या ठिकाणी एपॉक्सी लेप दिला जाणार असल्याने श्री विठ्ठलाचे मंदिर दर्शनाकरता काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो, असेही म्हटले जात आहे.