
हिंदी मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकताच प्रार्थना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आता तिचे लाखो चाहते आहेत. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. प्रार्थनाला आता एका आजाराचा सामना करावा लागत आहे. त्याविषयी तिने स्वत: माहिती दिली आहे.

प्रार्थना लवकरच 'चिकी चिकी बुमबूम' या प्रसाद खांडेकरच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे ती जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये प्रार्थनाने तिच्या आजारपणाविषयी सांगितले आहे.

प्रार्थनाला तिच्या स्कीनकेअर रुटिनविषयी विचारण्यात आले होते. त्यावर तिने, 'मी पूर्वी माझ्या त्वचेची फारशी काळजी घेत नव्हते. पण आता मी पुन्हा स्किनकेअर रुटीनकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे' असे म्हटले.

आजाराविषयी बोलताना प्रार्थना पुढे म्हणाली, 'रात्री मेकअप काढून मी नेहमी नाईट क्रीम लावते. काही काळ मी आळस केल्यामुळे माझ्या त्वचेवर त्याचा परिणाम झाला. त्यात मला थायरॉईड असल्याने माझी त्वचा कोरडी पडते. म्हणूनच मी आता डे क्रीम आणि नाईट क्रीम दोन्हीही नियमित लावते.'
