
देशातील 8 कोटींहून ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. या कर्मचाऱ्यांना आता पीएफ रक्कम काढण्यासाठी अर्ज फाटे करण्याची गरज नाही. त्यांना पीएफ रक्कम मिळवण्यासाठी दोन आठवडे वा महिनाभर प्रक्रियेत गुंतून वाट पाहण्याची गरज उरली नाही. 1 एप्रिल 2026 पासून कर्मचारी युपीआयच्या माध्यमातून पीएफ रक्कम काढू शकतील.

कामगार मंत्रालय या योजनेवर काम करत आहे. यामध्ये EPF चा एक भाग कर्मचाऱ्यांना काढता येणार नाही. तर उर्वरीत किती रक्कम काढता येईल हे EPFO पोर्टलवर रिअल-टाईममध्ये पाहता येईल. सदस्य आधार-लिंक्ड बँक खात्यात युपीआयच्या मार्फत रक्कम हस्तांतरीत करु शकतील. ही प्रक्रिया गुगल पे, फोन पे वा पेटीएमवरून आपण जशी रक्कम हस्तांतरीत करतो तशीच असेल.

माध्यमातील वृत्तानुसार, या नवीन फीचर्समुळे जवळपास 8 कोटी EPFO सदस्यांना मोठा फायदा होईल. सध्या EPFO वर्षाला 5 कोटींहून अधिक क्लेम प्रोसेस करतो. त्यामुळे या सिस्टिमवर मोठा दबाव पडतो. UPI आधारित रक्कम काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या ऑनलाईन क्लेम, दाव्याची संख्या एकदम कमी होईल आणि पीएफची रक्कम लागलीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

नवीन योजनेनुसार, EPF खातेधारकांना 100% पर्यंत रक्कम काढता येईल. पण खात्यात कमीत कमी 25% रक्कम ठेवणे बंधनकारक आहे. या राशीवर सरकारकडून वार्षिक 8.25% व्याज मिळते. या नवीन धोरणामुळे सदस्यांना अत्यंत निकडीच्यावेळी पीएफ खात्यातून पैसे काढता येईल. तर निवृत्तीसाठी रक्कम पण सुरक्षित राहील.

EPFO कडे बँकिंग परवाना नाही. त्यामुळे पैसे हे बँकेच्या माध्यमातून हस्तांतरीत होतील. UPI एक वेगवान आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म असेल. हे सर्व व्यवहार RBI च्या नियमानुसार होतील. त्यामुळे सुरक्षा आणि सुविधा दोन्ही असतील. हे बदल EPFO च्या मागील सुधारणेची एक कडी आहे. ऑटो सेटेलमेंट, मेडिकल, लग्न, शिक्षण, घर यासारख्या कारणांसाठी दावा मर्यादा, क्लेम लिमिट वाढवून 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

सध्या ही रक्कम BHIM ॲपच्या मदतीने काढण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचे समजते. पुढे गुगलपे, फोन पे अथवा इतर युपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करून सदस्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करता येईल. यासाठीची पुढील प्रक्रिया काय असेल हे लवकरच ईपीएफओ अधिकृतपणे पुढे आणले.