
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावं आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहेत.

अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने, पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी आज सकाळपासून सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांना धीर दिला.

पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील सकाळी 8.30 वाजल्यापासून आपला पाहणी दौरा सुरू केला होता. तब्बल 12 तास उलटच्यानंतरही त्यांचा हा पाहणी दौरा सुरुच होता.

जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील जवळपास 15 पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. या पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत नुकसानाची पाहणी केली. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून योग्य त्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दरम्यान काल मुंबईवरून सांगलीला जात असतानाही जयंत पाटील हे सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून सांगलीतील परिस्थितीचा आढावा घेत होते. 2019 च्या महापूराचा अनुभव लक्षात घेता त्यांनी आधीच हालचाली सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.