
रविवारी ७ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. हा दिवस आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी समर्पित केला जातो. या काळात दिवंगत पूर्वजांचे स्मरण करावे, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करावा आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावे यासाठी काही धार्मिक विधी केल्या जातात.

पितृपक्षात श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांसारखे विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात वातावरण शुद्ध आणि सात्विक असणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या काळात काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो.

पितृपक्षात सात्विक आहाराला विशेष महत्त्व दिले जाते. यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहतात. या काळात मांस, मद्य आणि तामसिक पदार्थ जसे की कांदा आणि लसूण खाणे टाळावे. त्याऐवजी हलके, साधे आणि सात्विक अन्न खावे.

पितृपक्ष हा शोक आणि स्मरणाचा काळ असतो. त्यामुळे या काळात कोणत्याही नवीन गोष्टींची खरेदी करणे टाळावे. तसेच या काळात कोणतंही शुभ कार्य करु नका. ते अशुभ मानले जाते.

पितृपक्षात कोणत्याही मोठ्या वस्तूंची खरेदी करु नका. या काळात नवीन कपडे, सोने, चांदीचे दागिने, नवीन वाहन किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे टाळावे. तसेच या काळात घर किंवा जमीन खरेदी करणे टाळावे. त्यासोबतच बूट, चप्पल, झाडू आणि इतर शुभ प्रसंगाशी संबंधित वस्तूंची खरेदी टाळावी.

या काळात श्राद्धाशी संबंधित वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. तांदूळ, जवस, काळे तीळ, चमेलीचे तेल, दिवे, अगरबत्ती आणि धार्मिक पुस्तके खरेदी करावे. यामुळे पूर्वज प्रसन्न होतात, असे मानले जाते.

पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण हे अत्यंत महत्त्वाचे विधी आहेत. या विधींमुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात. त्यामुळे आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण करावे. या काळात धार्मिक नियमांचे पालन केल्याने आणि सात्विक जीवनशैली स्वीकारल्याने पूर्वज प्रसन्न होतात. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, अशी श्रद्धा आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)