Narendra Modi Mumbai Security : बनावट आयडी, सोबतीला बंदूक, मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत नेमका घुसला तरी कसा? मुंबईत काय घोळ झाला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी बीकेसीमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली करणाऱ्या रोहन पारेख नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं.

पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा आहे. संध्याकाळी बीकेसीमध्ये आयोजित कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार आहेत. दरम्यान त्याआधीच आता मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. नेमकं घडलं तरी काय?
मोदींच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीच वेळापूर्वी बीकेसीतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये खळबळजनक घटना घडली.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. रोहन पारेख नावाचा मुलगा हा संशयितरित्या वागत होता. तो स्वतःला पीएमओचा अधिकारीही सांगत होता. मात्र सुरक्षेची व्यवस्था राबवणाऱ्या विशष सुरक्षा रक्षकांना त्याच्या हालचालींवर संशय आला.
त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे पीएमओ कार्यालयाचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले. पण ते बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. तो स्वतःला रोहनचा बॉडीगार्ड सांगत होता. त्याच्याकडे एक बंदुकही होती.
दरम्यान, दोघांनाही सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्व प्रकारानंतर आता गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. दोन्ही आरोपींची कडक चौकशी सुरु झाली आहे. ही घटना अत्यंत संवेदनशिल असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मुंबई क्राईम ब्रांचल पाहत आहे.