
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड शो होत आहे. घाटकोपर परिसरातून या रोड शोला सुरुवात झाली आहे. घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल समोरून रोड शोला सुरुवात झालीय. तर पर्शवनाथ मंदिर परिसरात रोड शोचा समारोप होणार आहे.

पंतप्रधानांचा रोडशो होत असलेल्या मार्गावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण घाटकोपर आज भगवंमय झालंय. साधू संत महात्मेदेखील रोडवर उतरले आहेत. तर काही वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी आलेत.

समारोप होणाऱ्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याला अभिवादन करून रोडशोचा समारोप होणार आहे. या रोड शोसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आज संध्याकाळी घाटकोपर इथल्या एलबीएस रोडवर होत आहे. स्थानिकांनी नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. मात्र या रोड शोमध्ये अजित पवार दिसत नाहीत. त्यामुळे अजितदादा नक्की कुठे आहेत? अशी चर्चा होऊ लागली आहे.