
भारतीय स्वयंपाकघरातील भाज्यांचा राजा म्हणून बटाटाला ओळखले जाते. बटाटा हा वर्षभर उपलब्ध असतो. पोटॅशियम (Potassium), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि ऊर्जा देणारे कर्बोदके (Carbohydrates) यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त असलेला बटाटा हा अनेक पदार्थांचा आधार आहे.

मात्र, तो किती प्रमाणात खावा याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. तज्ज्ञांच्या मते, बटाटा पूर्णपणे हानिकारक नसला तरी त्याचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकते.

आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, एका निरोगी व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त १५० ते २०० ग्रॅम उकडलेला किंवा भाजलेला बटाटा खाणे सुरक्षित आहे. बटाटा खाण्याची मात्रा आणि पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे.

अतिरिक्त बटाटे खाल्ल्याने गॅस, पोटफुगी, वजन वाढणे आणि रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. बटाट्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराला व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर पुरेशा प्रमाणात मिळते. बटाटे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि पचनसंस्था मजबूत करण्यास देखील मदत करतात.

मात्र बटाट्याच्या तेलकट पदार्थांपासून दूर राहण्याचा किंवा ते मर्यादित खाण्याचा सल्ला दिला जातो. चिप्स आणि फ्रेंच फ्राईजमध्ये ट्रान्स फॅट्स आणि ॲक्रिलामाइड (Acrylamide) मोठ्या प्रमाणात आढळतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे हे पदार्थ खाऊ नये, असा सल्ला दिला जातो.

रात्रीच्या जेवणात बटाटे पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते. तसेच बटाट्यातील स्टार्चचे रूपांतर चरबीत होण्याची शक्यता वाढते.

बटाट्याचे जास्त सेवन केल्याने इन्सुलिन प्रतिरोधकतेचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे कालांतराने मधुमेहाचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त त्यामुळे पोटफुगी, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या देखील निर्माण करू शकतात.

बटाटा हा एक पौष्टिक आणि बहुगुणी आहार आहे. परंतु त्याचे सेवन नेहमी नियंत्रित प्रमाणात आणि आरोग्यदायी पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे.