
अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'रस्ता सुरक्षा अभियाना'अंतर्गत जनजागृती केली. या अभियानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे दरवर्षी 1 ते 31 जानेवारीला 'रस्ता सुरक्षा अभियान' राबवण्यात येतं.

यावेळी ठाणे कार्यालयात जाऊन जनजागृतीसाठी काढण्याथ आलेल्या बाईक रॅलीचं फ्लॅग ऑफ करण्याची संधी अभिनेत्री प्राजक्ता माळीला मिळाली. याचे फोटो पोस्ट करत प्राजक्ताने नेटकऱ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले.

दुचाकीस्वारांनी (मागे बसलेल्या माणसानेदेखील) हेल्मेट वापरणे. चारचाकी वाहनांतील प्रत्येकाने सीट बेल्ट वापरणे, मद्यपान करून गाडी चालवू नये, गाडी चालवताना मोबाइल न वापरणे, हॉर्नचा कमीतकमी वापर करणे, अपघात झालाच तर समोरच्या व्यक्तीची मदत करणे, असे नियम तिने सांगितले आहेत.

आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने गाडी चालवली तर सगळेच सुरक्षित राहण्यास मदत होईल, असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

या फोटोंमध्ये प्राजक्ता सुपरबाईक्सवर बसलेली दिसून येत आहे. मात्र हेल्मेट न लावल्यामुळे नेटकरी ट्रोल करायला सुरुवात करतील म्हणून तिने कॅप्शनमध्ये तळटीपसुद्धा लिहिली आहे.

फक्त फोटोसाठी बाईकवर बसलेय, वास्तविक मला अशा बाईक्स चालवताच येत नाहीत. त्यामुळे मी हेल्मेट लावलं नाही, असं तिने या तळटीपमध्ये स्पष्ट केलंय. त्यावरूनही नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तळटीप दिलीस ते एक बरं केलंस, नाहीतर यावर किमान हजारो कमेंट्स आल्या असत्या, असं काहींनी म्हटलंय.