
अभिनेत्री प्राजक्ता माळीने गावच्या कावडीचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. प्राजक्ताने सहकुटुंब तुळजाभवानीचंही दर्शन घेतलं आहे.

प्राजक्ता माळीने या कावडीमागची गोष्ट सांगितली आहे. 'शिंदे - लोखंडे - जीवाभावाचे मित्र. लोखंडेंनी शिखरशिंगणापूरला राजाकडून मान- निशाणी मिळवण्यासाठी दांडपट्ट्यामध्ये जिंकून तो मिळविण्याचा पण केला,' असं तिने लिहिलं.

'ते जिंकले, मान मिळाला पण दांडपट्टा खेळत असता लोखंडेंची प्राणज्योत मालवली, मैत्रीत खंड पडला. शेवटच्या घटका मोजत त्यांनी शिंदेकडून वचन घेतलं,' अशी गोष्ट तिने सांगितली.

वचनाबद्दल ती पुढे लिहिते, "जोवर आकाशात चंद्र- सूर्य आहेत तोवर आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून शिंदे- लोखंडे अशा दोन्ही कावडी एकत्र शिखरशिंगणापूरला जातील. त्यात खंड पडणार नाही आणि तोवर मानाप्रमाणे दोन्हीं कावडींच्या पताकांची नक्कल कोणीही करू शकणार नाही."

'गेल्या कित्येक पिढ्यांपासून भाळवणीकर दोन मित्रांचं हे वचन प्राणपणानं जपतात. आजही जेव्हा कावडी शिखरशिंगणापूरला जातात भाळवणी निर्मनुष्य होते,' असं तिने सांगितलंय.

कावडीनिमित्त चार पिढ्या एकत्र आल्या. लेकरांना कोकरं - पिल्लं भेटली, अशी भावना प्राजक्ता माळीने व्यक्त केली. या पोस्टमध्ये तिने #परंपरा #एकी #वचनबद्ध #पिढ्या असे हॅशटॅग्स दिले आहेत.