
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अनेक उमेदवार त्यांच्या मतदारसंघात प्रचार करत आहेत. काहींनी त्यांच्या प्रचारात सेलिब्रिटींनाही सहभागी करून घेतलं आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अशाच एका प्रचारसभेत सहभागी झाली.

राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी प्राजक्ता माळीने चंद्रपूर-वणी आणि आर्णीमध्ये रोड शो केला.

लाल साडी नेसून प्राजक्ता या रोड शोमध्ये सहभागी झाली होती. सनरुफ कारमधून प्रवास करत तिने मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचार केला. प्राजक्ताला पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली होती. ढोल-ताशाच्या गजरात हा रोड शो पार पडला.

प्रचारासाठी आयोजित केलेल्या या रोड शोमधील प्राजक्ताच्या लूकची खास चर्चा होत आहे. लाल काठपदराची साडी आणि त्यावर दागिने असा तिचा पारंपरिक लूक होता. भाजपचे कार्यक्रम आणि प्रचारसभेत ती सक्रियपणे सहभागी होताना दिसत आहे.

प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. ती या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आहे. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.