
पुणे परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर धरणात जलसाठा वाढला आहे. काही धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. खोऱ्यात सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे.

भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे धरण पूर्ण भरले आहे. पावसाचे प्रमाणात वाढ झाल्यामुळे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या १६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. भाटघर धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून २०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

भाटघर धरणापाठोपाठ वरसगाव पुन्हा शंभर टक्के भरले आहे. तसेच पानशेतही जवळपास शंभर टक्के भरले आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याचे सांगितले.

पुणे परिसरातील धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा लाभ शेतीला होणार आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, हवेली तालुक्याला याचा लाभ होणार असल्यामुळे शेतकरी आनंदीत झाले आहे. रब्बी हंगाम चांगला येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

शेतीला खडकवासला धरणातून खरीपाचे आवर्तन सध्या सुरू आहे. त्यानंतर 5 आक्टोंबर शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 4, पानशेत येथे 2, तर वरसगाव येथे 2 मिलीमीटर पाऊस पडला.