
झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'रात्रीस खेळ चाले'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी 'सरिता' म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता वाडये आंबोलीतील निसर्गाच्या प्रेमात पडली आहे.

प्राजक्ताने सुट्ट्यांचा मुहूर्त साधून आंबोली या पर्यटनस्थळाला भेट दिली. आंबोली टुरिझम मार्फत तेथील निसर्ग, धुके, धबधबे, मंदिरे, व्हॅली पॉइंट्स या पर्यटनस्थळांसह रात्रीची नेचर ट्रेलसुद्धा अनुभवली आहे.

प्रसिद्ध अशा हिरण्यकेशी मंदिरालाही तिने भेट देऊन दर्शन घेतले. येथील स्वर्गिय देखावे पाहून ती आंबोलीच्या प्रेमात पडली आहे.

प्राजक्ताने पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच प्राजक्ताच्या आंबोली ट्रिपवेळी लाडक्या सरितासोबत फोटोकरिता अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती.

रात्रीस खेळ चाले या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेची तिन्ही पर्व यशस्वी ठरली. सरिता ही लक्षवेधी भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजली.