
जगभरात लिपस्टिक हे महिलांसाठी सौंदर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतिक मानले जाते. आजघडीला लिपस्टिकचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या रंगातही आज लिपस्टिक भेटते. विशेष म्हणजे ब्रँडनुसार या लिपस्टिकची किंमतही बदलत राहते. जगभरात लाल रंगाची लिपस्टिक वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. पण आता हीच लाल रंगाची लिपस्टिक महिलांसाठी संकट बनून आली आहे.

एका देशात महिलांना लाल रंगाची लिपस्टिक लावण्यास मनाई आहे. एखादी महिला असा गुन्हा करताना आढळली तर तिच्यावर कारवाई केली जाते. विशेष म्हणजे येथे महिलांना फक्त हलक्या रंगाची आणि स्वत:च्या देशात तयार झालेलीच लिपस्टिक लावण्यास परवानगी आहे.

लाल लिपस्टिकवर बंधनं टाकणाऱ्या या देशाचे नाव आहे. उत्तर कोरिया. किम जोंग उन हा या देशातील हुकूमशाहा आहे. याच देशात लाल रंगाच्या लिपस्टिकला पाश्चिमात्त्य संस्कृत आणि भांडवलशाहीचे प्रतिक मानले जाते. म्हणूनच या देशात लाल लिपस्टिकवर अनौपचारिक परंतु कडक प्रतिबंध आहेत.

उत्तर कोरियात लाल रंगाच्या लिपस्टिकला ग्लॅमर, वैयक्तिक आकर्षण आणि पश्चिमी प्रभावाचे प्रितक मानले जाते. अशा प्रकारच्या मेकअपमुळे तरुण-तरुणींमध्ये व्यक्तीवाद वाढतो. परिणामी देशापुढे संकट उभे राहू शकते, असे किम जोंग उनला वाटते. म्हणूनच तिथे लाल रंगाची लिपस्टिक लावली की कारवाई केली जाते.

उत्तर कोरियात महिलांना फक्त हलक्या रंगाची लिपस्टिक लवण्यास तसेच सीमित मेकअप करण्यास परवानगी आहे. परदेशी ब्रँड, गडद रंग आणि भडक मेकअप करणे हे नियमांच्या विरोधात मानले जाते. या नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाते.