
ग्रामीण भारतातील महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारी 'सौभाग्यवती सरपंच' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे.

'सौभाग्यवती सरपंच' या नवीन वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे की गावातील महिला जेव्हा समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतात, तेव्हा त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. परंतु या महिलांनी दाखवून दिलं की जिथे महिलांना स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं, तिथे समाजाची खरी प्रगती होते.

संतोष कोल्हे दिग्दर्शित या सीरिजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, नागेश भोसले आणि अश्विनी कुलकर्णी यांसारखे उत्तम कलाकार पाहायला मिळतील. ही सिरीज अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येईल.

एकीकडे दादाराव.. गावाचा दोन टर्म सरपंच, ज्याचं जीवन केवळ राजकारणापुरतं मर्यादित असतं. तर दुसरीकडे अवली ही एक सामान्य गृहिणी आहे, जी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली असून तिचं जीवन नवरा, मुलगा आणि सासू यांच्याभोवती फिरत असतं.

मात्र, जेव्हा महिलांच्या हातात सत्ता येते, तेव्हा त्या कर्तृत्वाची ताकद दाखवून देतात, हे अवलीच्या प्रवासातून दिसून येतं. सरपंचपदावर निवड झाल्यानंतर अवली गावातील समस्यांवर तोडगा काढते, महिलांसाठी नवी दालनं उघडते आणि संपूर्ण गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून देते.

या प्रवासात तिच्यासमोर अनेक अडचणी येतात. कधी घरातील अपेक्षांचा ताण, तर कधी गावातील प्रश्नांवर उपाय शोधण्याची गरज. मात्र, तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये गावाच्या भल्यासाठीची तळमळ आणि कुटुंबाच्या आनंदासाठीचा त्याग दिसतो, जो प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच भिडतो.

घराची, जवळच्या नात्यांची आणि सरपंपदाची जबाबदारी पार पडत असताना अडचणी उभ्या राहतात आणि त्या अडचणींवर ती कसे तोडगे काढते, हे केवळ महिलांनीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने बघण्यासारखं आहे.