
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. याआधी शुभमनचं नाव अभिनेत्री सारा अली खान आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र शुभमन सारा अली खान किंवा सारा तेंडुलकर नव्हे तर टीव्ही अभिनेत्री रिधिमा पंडितशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

यावर्षी डिसेंबर महिन्यात शुभमन आणि रिधिमा लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं गेलंय. लग्नाच्या या चर्चांवर अखेर रिधिमाने मौन सोडलं आहे. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं तिने स्पष्ट केलंय. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडीओ पोस्ट करत ती याविषयी व्यक्त झाली.

"सकाळी उठल्या उठल्या मला पत्रकारांचे अनेक फोन येऊन गेले. माझ्या लग्नाबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. पण कोणतं लग्न? मी लग्न करत नाहीये आणि माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं काही घडणार असेल तर मी स्वत: त्याची माहिती देईन. या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही", असं रिधिमान सांगितलं.

शुभमनसोबत होणाऱ्या लग्नाच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आलेली रिधिमा ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती याआधी माजी क्रिकेटर राहुल द्रविडसोबत झळकली होती. तिने राहुल द्रविडसोबत एका जाहिरातीत काम केलं होतं. एशियन पेंट्सच्या जाहिरातीत राहुल आणि रिधिमा एकत्र दिसले होते. जवळपास सात वर्षांपूर्वी ही जाहिरात आली होती.

रिधिमासोबत लग्नाच्या चर्चांवर अद्याप शुभमनने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील जयपूर याठिकाणी दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं गेलं आहे.