
'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री रोशेल रावने 2023 मध्ये मुलगी जोसेफिन सीक्वेराला जन्म दिला होता. त्यानंतर ती सोशल मीडियापासून दूर गेली. आता तिची मुलगी दोन वर्षांची होणार असून त्यापूर्वी रोशेलने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये तिने सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर राहण्यामागचं कारण सांगितलं आहे. मागचा काही काळ हा प्रचंड चढउतारांचा होता, असं तिने म्हटलंय. यादरम्यान रोशेलच्या आईचं निधन झालं होतं. मानसिकदृष्ट्या ती पूर्णपणे खचली होती.

या सर्वांतून सावरण्यासाठी रोशेलला काही वेळ हवा होता. मुलीलाही पुरेसा वेळ द्यायचा होता, म्हणून ती सोशल मीडियापासून दूर होती. तिने लिहिलं, 'ती अत्यंत भावनिक वेळ होती, जेव्हा मी माझ्या आईला गमावलं होतं. या गोष्टीला आता दहा महिने पूर्ण झाले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं.'

'मुलीला सांभाळत मला स्वत:ला त्या दु:खातून सावरायचं होतं. सर्वकाही ठीक करायचं होतं. सगळ्या गोष्टी समजण्यात आणि प्रार्थना करण्यात मला काही वेळ लागला. माझी आई नेहमी वाढदिवसाला खास बनवायची. आता माझ्या मुलीसाठीही मी तेच करावं अशी इच्छा असेल. त्यामुळे तुमच्यासोबत मी काही अविस्मरणीय क्षण शेअर करेन', अशा शब्दांत रोशेल व्यक्त झाली.

यापुढे सोशल मीडियावर चाहत्यांसोबत पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करणार असल्याचं रोशेलने सांगितलंय. यासोबतच तिने एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसतेय. 'यानंतर माझ्या आईशी माझं शेवटचं बोलणं झालं होतं', असं तिने या व्हिडीओवर लिहिलं आहे.