
रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं पहिलं विमान संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास मुंबईत दाखल झालं आहे.

219 विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान रोमानियावरुन निघालं आणि शनिवारी संध्याकाळी हे विमान मुंबईत दाखल झालं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.

त्यावेळी खासदार पुनम महाजन, महापौर किशोरी पेडणेकर, भाजप आमदार पराग शाह, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह विद्यार्थ्यांचे कुटुंबियही उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्याला विमानतळावर पाठवल्याचं पियुष गोयल आणि पुनम महाजन म्हणाल्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत करत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

यूक्रेनमधील युद्धाच्या संकटातून बाहेर पडत सुखरुपपणे मायदेशी परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.