
नुकत्याच एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि सहकलाकार अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी त्यांचा गाजलेला चित्रपट 'नवरा माझा नवसाचा' याबद्दलही भाष्य केले. सचिन यांनी सांगितले की, या चित्रपटात त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांना घ्यायचे होते, परंतु लक्ष्मीकांत यांच्या प्रकृतीमुळे ते शक्य झाले नाही.

सचिन म्हणाले, “मी लक्ष्याला खूप मिस करतो. 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट 2004 मध्ये तयार झाला आणि जानेवारी 2005 मध्ये तो प्रदर्शित झाला. या चित्रपटात मी त्याला कास्ट करू इच्छित होतो, पण त्याच्या तब्येतीमुळे तो स्वतःहून म्हणाला, ‘तुझी इच्छा आहे हे ऐकून मला आनंद झाला, पण डॉक्टरांनी मला परवानगी दिली नाही.’ त्यामुळे तो या चित्रपटाचा भाग होऊ शकला नाही. दुर्दैवाने, डिसेंबर 2004 मध्येच लक्ष्या आपल्याला सोडून गेला. फक्त मीच नाही, तर प्रेक्षक आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी त्याला मिस करते. पण माझ्यासाठी ही आठवण केवळ व्यावसायिक नाही, तर वैयक्तिक पातळीवरही मी त्याला खूप मिस करतो.”

सचिन पिळगांवकर यांनी 'अशी ही बनवा बनवी' या चित्रपटाच्या निर्मितीवेळी आलेल्या अनुभवांबद्दलही सांगितले. “हा चित्रपट बनवताना मला एक कल्पना सुचली होती, ‘भट्टी जमली आहे बॉस.’ या चित्रपटातील बहुतांश संवाद मी आणि वसंत सबनीस यांनी एकत्र बसून स्क्रिप्टमध्ये लिहिले होते. फक्त तीनच संवाद सेटवर आपोआप तयार झाले."

"‘धनंजय माने इथेच राहतात का?’, हा संवाद स्क्रिप्टमध्येच होता. मी वसंत सबनीस यांना दाखवले होते की मला तो कसा हवा आहे. ‘हा माझा बायको पार्वती’ हा अशोकचा संवाद, ‘सारखं सारखं काय त्याच झाडावर’ हा माझा संवाद आणि ‘जाऊबाई, नका ओ जाऊ...’ हा लक्ष्याचा संवाद हे सेटवर उत्स्फूर्तपणे बोलले गेले. बाकी सर्व संवाद आधीपासूनच स्क्रिप्टमध्ये लिहिलेले होते,” असे सचिन यांनी सांगितले.

'अशी ही बनवा बनवी' या चित्रपटात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुशांत रे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. याशिवाय निवेदिता जोशी-सराफ, अश्विनी भावे आणि सुप्रिया पिळगांवकर यांसारख्या अभिनेत्रींनीही या चित्रपटात आपल्या भूमिकांनी रंगत आणली. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळेच स्थान निर्माण केले आणि आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीचा आहे.