अरबाजने गुपचूप उरकलं लग्न, बेगमचा फोटो पाहिलात का? सर्वत्र चर्चा
सैराट चित्रपटातून प्रसिद्ध झालेला सल्या म्हणजे सर्वांचा लाडका अरबाज शेख नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याच्या गर्लफ्रेंड सिमरनसोबत निकाल केला असून फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत मोठा ठसा उमटवणाऱ्या 'सैराट' या चित्रपटातील ‘सल्या’ या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता अरबाज शेख आता विवाहबंधनात अडकला आहे. त्याने आपल्या दीर्घकाळच्या मैत्रीण सिमरन हिच्याशी नुकताच निकाह करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

अरबाज आणि सिमरनचा निकाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. लग्नातील फोटोंमध्ये हे जोडपे सोनेरी रंगाच्या पोशाखात दिसले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर विशेष चर्चेत आले आहेत.

सिमरनने सोनेरी साडी परिधान केली होती तर अरबाजने त्याला साजेशी सोनेरी शेरवानी घातली होती. दोघेही अत्यंत आकर्षक आणि आनंदी दिसत होते. एका फोटोमध्ये सिमरन सेल्फी घेताना दिसते तर अरबाज तिच्यासोबत पोज देताना दिसतो. तिच्या हातातील पुष्पगुच्छही लक्ष वेधून घेतो.

अरबाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत “Just Us ❤️” असे कॅप्शन दिले. ही आनंदाची बातमी समोर येताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

विशेष म्हणजे, ‘आर्ची’ची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू हिनेही रेड हार्ट इमोजी देत शुभेच्छा दिल्या. ज्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. तसेच अरबाज शेखच्या या नव्या प्रवासासाठी त्याच्या चाहत्यांकडून आणि मराठी चित्रपटसृष्टीकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.