
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. सध्या ती तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. समांथाने द फॅमिली मॅन या वेब सीरिजचे दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी लग्नगाठ बांधली.

समांथा आणि राज यांनी तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात एका खासगी समारंभात लग्न केले. या सोहळ्याला केवळ ३० जवळचे पाहुणे उपस्थित होते. यावेळी समांथाने लाल रंगाची साडी नेसली होती. तर राज यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर गोल्डन रंगाचा जॅकेट परिधान केला होता.

समांथाने स्वतः त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या वृत्तांना दुजोरा दिला आहे. समांथा आणि राज यांच्या लग्नानंतर या दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत आहे, याबद्दल चर्चा रंगली आहे.

राज निदिमोरू हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक आणि लेखक आहेत. ते त्यांचे क्रिएटिव्ह पार्टनर कृष्णा डीके यांच्यासोबत 'राज आणि डीके' (Raj & DK) या नावाने काम करतात. पिंकव्हिलाच्या अहवालानुसार, राज यांची एकूण संपत्ती सुमारे ८० ते ८५ कोटी रुपये इतकी आहे.

'द फॅमिली मॅन', 'गो गोवा गॉन', 'स्त्री', 'फर्जी' आणि 'सिटाडेल: हनी बनी' यांसारख्या सुपरहिट कलाकृतींमुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. राज यांनी एसव्हीयू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून संगणक विज्ञानात बी.टेक पदवी मिळवली आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले.

तर समांथा रूथ प्रभू ही दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील एक अग्रगण्य आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. स्टॉकग्रो २०२३ च्या अहवालानुसार, समांथाची एकूण संपत्ती १०१ कोटी रुपये इतकी आहे.

ती प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे ३ ते ५ कोटी रुपये मानधन आकारते. पुष्पा: द राइज या चित्रपटातील 'ऊ अंटावा' या गाण्यासाठी तिने सुमारे ५ कोटी मानधन घेतले होते. त्यासोबत ती अनेक मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातीही करते. यातून ती दरवर्षी सुमारे ८ कोटी रुपये कमावते.

समांथाकडे एक अलिशान अपार्टमेंट असून त्याची किंमत ७.८ कोटी इतकी आहे. त्यासोबतच तिने मुंबईत सी-फेसिंग ३-बीएचके अपार्टमेंटमध्ये देखील गुंतवणूक केली आहे, ज्याची किंमत १५ कोटी असल्याचा अंदाज आहे. समांथा ही कारची शौकीन आहे. तिच्याकडे ऑडी क्यू७, लँड रोव्हर रेंज रोव्हर, पोर्श केमन जीटीएस आणि मर्सिडीज-बेंझ जी६३ यांसारख्या लक्झरी गाड्या आहेत.