
प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री संयुक्ता शानने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. संयुक्ताने माजी क्रिकेटर अनिरुद्ध श्रीकांतशी लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. परंतु त्याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. या दोघांनीही साखरपुड्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती.

आता अचानक लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 27 नोव्हेंबर 2025 रोजी संयुक्ता आणि अनिरुद्ध यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. लग्नसोहळ्यात संयुक्ताने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. तर नवरदेव अनिरुद्धनेही त्याच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.

संयुक्ता आणि अनिरुद्ध यांनी त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय. लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

संयुक्ता शानचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने कार्तिक शंकरशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना रेयान हा मुलगासुद्धा आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर संयुक्ता आणि कार्तिक यांच्यात खटके उडू लागले. यादरम्यान संयुक्ताने कार्तिकवर फसवणुकीचाही आरोप केला होता.

संयुक्ताने 2025 या वर्षाच्या सुरुवातीलाच कार्तिकला घटस्फोट दिला. तर अनिरुद्धचंही हे दुसरं लग्न आहे. त्याने आरती व्यंकटेशशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु या दोघांचाही संसार फार काळ टिकू शकलं नाही.