
पूर्व अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम सना खान दुसऱ्यांदा आई बनली आहे. 5 जानेवारी 2025 रोजी तिने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे.

मुफ्ती अनस सय्यदशी निकाह केल्यानंतर 5 जुलै 2023 रोजी सनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तारिक जमिल असं आहे. सनाने 21 नोव्हेंबर 2020 रोजी सूरतमधील व्यावसायिक मुफ्ती अनस सय्यदशी निकाह केला होता.

सनाने 2012 मध्ये 'बिग बॉस 6'मध्ये भार घेतला होता. त्यानंतर ती विविध चित्रपट आणि शोजमध्येही झळकली होती. मात्र ऑक्टोबर 2020 मध्ये तिने मनोरंजन क्षेत्र पूर्णपणे सोडत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

इस्लाम धर्माचं कारण देत सनाने ग्लॅमर विश्व कायमचं सोडून दिलं आहे. सना तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असते. अनसशी लग्न केल्यानंतर तिला अत्यंत महागड्या रेस्टॉरंटमध्ये आणि परदेशात फिरताना पाहिलं गेलंय.

काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमध्ये सनाने दहा-बारा मुलांना जन्म घालण्याची इच्छा व्यक्त केली होती. "आधीच्या जमान्यात 12-12 मुलं जन्माला घातली जायची", असं ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं होतं.