
म्हशी, गायी... यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात असतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की एका शेळीची किंमत म्हशीपेक्षाही जास्त आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण हे खरंच घडलं आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ही घटना घडल्याचे पाहायला मिळत आहे. गोटखिंडी येथील तरुण शेतकरी दीपक नांगरे यांच्याकडील एका देखण्या बिटल जातीच्या शेळीने चक्क 1,01,000 रुपये इतका विक्रमी दर मिळवत सर्वांना थक्क केले आहे.

यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या शेळीला मिळालेल्या विक्रमी दरामुळे परिसरात एक गमतीशीर चर्चा सुरू झाली आहे. ही नुसती शेळी नाही, तर चालती-फिरती गोल्डन गोट आहे, असे म्हटले जात आहे.

दीपक नांगरे यांनी या बिटल शेळीचे संगोपन एका मुलाप्रमाणे केले होते. तिच्या खाण्यापिण्यापासून ते आरोग्यापर्यंत त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. परिणामी, उत्तम शरीरयष्टी, टोकदार कान आणि राजबिंडा रुबाब यामुळे या शेळीची किंमत लाखोंच्या घरात पोहोचली.

दीपक नांगरे यांची ही शेळी अवधूत चिखलगुट यांनी विकत घेतली. मात्र हा व्यवहार पाहण्यासाठी गावात लोकांची अक्षरशः जत्रा भरली होती. अनेकांना इतक्या मोठ्या आकड्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे स्वतःच्या डोळ्यांनी व्यवहार पाहण्यासाठी तरुण आणि शेतकऱ्यांनी गर्दी केली.

सामान्यतः चांगल्या म्हशीची किंमत 70 ते 80 हजार इतकी असते. पण या व्हिआयपी शेळीने थेट 1 लाखांचा पल्ला गाठून म्हशींनाही मागे टाकले आहे. दीपक नांगरे यांच्या मेहनतीला मिळालेल्या या यशामुळे, वाळवा तालुक्यात केवळ शेळीचीच नाही, तर दीपकच्या शेती कौशल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.